मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कर्ज योजना: मुंबईत महिलांना मिळणार ०% व्याजदराने १ लाखांपर्यंत कर्ज!
महाराष्ट्रामधील महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेच्या पात्र महिलांसाठी आता 'लाडकी बहिण कर्ज योजना' अंतर्गत तब्बल 0% व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही दिलासादायक घोषणा केली आहे. या संदर्भात, १९ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'वर्षा' निवासस्थानी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला, 'लाडकी बहिण' योजनेच्या पात्र महिलांना ९ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात आला होता.
मात्र, महिलांना अधिक मोठा फायदा मिळावा आणि त्यांना कोणताही आर्थिक भार जाणवू नये, या उद्देशाने मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने यामध्ये पुढाकार घेतला आहे. बँकेने हे कर्ज चक्क ०% (शून्य टक्के) व्याजदराने उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे महिला उद्योजकांना एक मोठा आधार मिळणार आहे, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
या कर्ज योजनेचा मुख्य उद्देश 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा नियमित लाभ घेणाऱ्या महिलांना एकत्र येऊन छोटे उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे हा आहे. सामूहिक प्रयत्नांतून महिलांना स्वयंरोजगार मिळवून बेरोजगारीवर मात करता येईल, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
या कर्जाची परतफेड करणे अत्यंत सोपे करण्यात आले आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या मासिक हप्त्यातूनच या कर्जाचे हफ्ते आपोआप वजा केले जातील. यामुळे कर्जाच्या परतफेडीचा ताण जाणवणार नाही आणि महिलांना त्यांच्या व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.
तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल, तर त्यांना 'लाडकी बहिण कर्ज योजने'ची ही महत्त्वाची माहिती नक्की कळवा. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक महिलांना आपला उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी, ० टक्के व्याजदराने मिळत असलेले हे कर्ज व्यवसाय उभारणीसाठी नक्कीच खूप मदत करेल.
सध्या, ही 'लाडकी बहिण कर्ज योजना' केवळ मुंबई शहर आणि उपनगरातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने हे कर्ज दिले जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सध्या १६ लाखांहून अधिक 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचे लाभार्थी आहेत, ज्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
ही योजना सध्या मुंबईपुरती मर्यादित असली तरी, भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात ती लागू होण्याची शक्यता आहे. जर ही योजना राज्यभर लागू झाली, तर राज्यातील लाखो महिलांना आपला उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी या योजनेमुळे मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. मुंबईतील महिला वैयक्तिकरित्या किंवा सामूहिकरित्या हे कर्ज घेऊन आपला उद्योग-व्यवसाय सुरू करू शकतात.
लक्षात घ्या: सध्या ही योजना केवळ मुंबई शहर आणि उपनगरामध्येच सुरु आहे. अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी, संबंधित मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेशी किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे उचित ठरेल.